गरवारे स्थापना दिवस सोहळा उत्साहात साजरा..

गरवारे स्थापना दिवस सोहळा उत्साहात साजरा..

ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मान..

संपूर्ण देशात व्यावसायिक शिक्षण देण्यात अग्रेसर असणार्‍या
मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या 39वा स्थापना दिन सोहळा शनिवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी
गरवारे संस्थेच्या प्रांगणात पार पडला. मागील चार दिवसांपासून विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, छायाचित्र, सर्जनशील लेखन , क्रिकेट सामने अशा विविध स्पर्धांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने प्रमुख पाहुणे एसेक्स सप्लाय चेनचे संचालक मा. अनिल राधाकृष्णन, गरवारे सल्लागार मंडळाचे सदस्य राजेंद्र भागवत, लॉजिस्टिक्स आणि कस्टम क्लीअरन्स विभागाचे वर्ग समन्वयक प्रकाश खत्री , गरवारे संस्थेचे संचालक डॉक्टर केयूर कुमार नायक यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि मराठी पत्रकारिता वर्गाच्या माजी समन्वयक नीला उपाध्ये यांचा आणि ज्येष्ठ पत्रकार तसेच वर्गाचे विषय शिक्षक नारायण हरळीकर यांचा संस्थेला दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. नीला उपाध्ये यांनी मागची 23 वर्षे मराठी पत्रकारिता वर्गाच्या समन्वयक पदाची धुरा सांभाळली..त्यानंतर त्या विषय शिक्षक म्हणून 2 वर्षे अशी 25 वर्षे वर्गासाठी कार्यरत होत्या..
याप्रसंगी मराठी पत्रकारिता वर्गाच्या वर्ग समन्वयक नम्रता कडू यांनी त्यांना संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या मानपत्राचे वाचन करून या ज्येष्ठ पत्रकारांच्या कारकीर्दीला उजाळा दिला. सर्व उपस्थितांनी उभे राहून या दोन्ही ज्येष्ठ पत्रकारांना मानवंदना दिली. या कार्यक्रमात संस्थेच्या प्रत्येक व्यावसायिक अभ्यासक्रमातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मराठी पत्रकारिता वर्गाचा विद्यार्थी सुजित शिर्के याला यावर्षीचा पुरस्कार मिळाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभ्रा नायक यांनी केले . शेवटी आभार प्रदर्शन संस्थेच्या प्लेसमेंट अधिकारी शिल्पा बोरकर यांनी केले.
रविवारी देखील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *