विजेचा धक्का लागलेल्या अपघातग्रस्तांची अभिजीत पाटील, सुदाम पाटील, अनिल नाईक आदींनी घेतली रुग्णालयात भेट

परिस्थितीचे भान न राखता उपायुक्त विठ्ठल डाकेंकडून मिळालेली उडवाउडवीची उत्तरे असंवेदनशील- अभिजीत पाटील

पनवेल महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे अपघात घडला- सुदाम पाटील

विजेचा धक्का लागलेल्या अपघातग्रस्तांची अभिजीत पाटील, सुदाम पाटील, अनिल नाईक आदींनी घेतली रुग्णालयात भेट

पनवेल: प्रतिनिधी :- 
शुक्रवारी पनवेलमध्ये गणपती विसर्जनदरम्यान घडलेली घटना अत्यंत चिंताजनक व दुर्दैवी आहे. गणेश विसर्जन सोहळ्यात एकाच कुटुंबातील ११ जण विजेचा धक्का बसून अपघात घडणे ही घटना हृदय हेलावून टाकणारी आहे. मात्र ही दुर्घटना घडण्याला महापालिकेचा ढिसाळ कारभार कारणीभूत आहे. कंत्रादारांकडून कमिशनखोरी केल्यामुळे अशाप्रकारची दुय्यम दर्जाची कामे केली जातात, असा हल्लाबोल पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केला. लाईफलाईन रुग्णालयात जखमींची भेट घेतल्यानंतर अपघातग्रस्त रुग्णांना व नातेवाईकांना भेडसावणाऱ्या समस्यांबात चर्चा करण्यासाठी व त्यातून मार्ग काढण्यासाठी पालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्याकडून सहकार्य मिळण्याचे सोडून उडवाउडवीची उत्तरे मिळणे ही बाब अत्यंत अशोभनीय असून अधिकाऱ्यांच्या तोंडी अशी भाषा येते कुठुन आणि यासाठी यांना संरक्षण देतंय कोण? असा सवालही अभिजीत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
अभिजित पाटील पुढे म्हणाले की, कालच्या घटनेनंतर लाईफ लाईन हॉस्पिटल येथे ४ अपघातग्रस्त जखमींना दाखल केले असून त्यापैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्याला तात्काळ मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची गरज आहे. यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना आता मदतीची गरज असुन महापालिकेचे कोणतेही अधिकारी उत्तर द्यायला तयार नाहीत. मी स्वतः आयुक्त गणेश देशमुख यांना १० पेक्षा जास्तवेळा फोन केला, परंतु त्यांनी फोन घेतला नाही. नंतर अशी माहिती मिळाली की ते त्यांच्या घरच्या गणपती विसर्जनामध्ये मश्गूल होते. हे सगळे मुजोर अधिकारी आहेत. यांना कोणत्याही जबाबदारीचे भान नाही. त्यानंतर दुसरा फोन उपायुक्त विठ्ठल डाके यांना केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत तुम्ही हस्तक्षेप करू नका, आमचं आम्ही बघु, तुम्ही आम्हाला शिकवू नका अशी भाषा वापरली. अशी मुजोरी करण्यासाठी अशा अधिकाऱ्यांना संरक्षण कोण देतय याचा शोध लावला पाहिजे. सध्या या मुलाला मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचे पहिले कर्तव्य महानगरपालिकेचे आणि सत्ताधारी पक्षाचे आहे. रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या पाठीशी उभे राहणे सोडून पालिकेचे अधिकारीवर्ग त्यांना वाऱ्यावर सोडत असल्याचा आरोपही अभिजीत पाटील यांनी यावेळी केला.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील म्हणाले की, पनवेलमध्ये जी घटना घडली ती दुर्दैवी आणि खेदजनक आहे. खरेतर अशा घटना घडू नयेत. परंतु या परिस्थितीकडे लक्ष दिले तर असे दिसून येते की महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळेच ही घटना घडली आहे. पालिकेचे सगळे अधिकारी त्यांच्यातच मश्गूल असुन आयुक्त त्यांच्या गणपती विसर्जनात बंगल्यावर व्यस्त आहेत. पालिकेत ४ उपायुक्त असूनही रुग्णांच्या पुढील उपचारासाठी व हॉस्पिटलच्या बिलासाठी कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. जखमी रुग्णाची अवस्था चिंताजनक असून मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची गरज आहे. अश्यावेळी मुलाच्या कुटुंबासोबत आम्ही चर्चा केली असता त्यांच्याकडून असे समजले की, महापालिका कोणतेही सहकार्य करत नाही.
अपघातग्रस्त मुलाला डिस्चार्ज देताना ४५ हजाराचे बिल झाले आहे. ही सगळी आर्थिक जबाबदारी महापालिकेची असुन अधिकारी हात वर करण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर प्रकरणाबाबत आम्ही खासदार माजी मंत्री सुनील तटकरे यांच्यासोबत संवाद साधला असता महापालिकेला सकारात्मक कारवाई करण्यास भाग पाडतील असे सांगण्यात आले. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कोणाच्याही जीवाची पर्वा नाही. पनवेलमधील जनता हे पाहत आहे की पनवेल महापालिकेच्या अधिकारीवर्गाकडून टोलवाटोलवीची उत्तरे मिळत आहेत. ही बाब अत्यंत खेदजनक असून पनवेल महापालिका नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत.
पनवेलमध्ये दहा दिवसांच्या गणेश विसर्जनादरम्यान जनरेटर केबल तुटून एकाच कुटुंबातील ११ गणेशभक्तांच्या अंगावर पडून अपघात घडल्याने त्यांना पनवेलमधील लाईफ लाईन हॉस्पिटल, नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय व पटवर्धन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी व नातेवाईकांच्या मदतीसाठी काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, समाजवादी पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, प्रताप गावंड, अमित लोखंडे, पनवेल शहर युवक काँग्रेस अध्यक्ष राकेश जाधव यांनी भेट घेऊन हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी व रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा केली.

One thought on “विजेचा धक्का लागलेल्या अपघातग्रस्तांची अभिजीत पाटील, सुदाम पाटील, अनिल नाईक आदींनी घेतली रुग्णालयात भेट”

  1. Good work abhijitji who is responsible for this accident contractor also responsible due to carelessness can we make complaint ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *